Tuesday, September 3, 2013

पाऊस आणि तू
दोघेही सारखेच…!!

तो आभाळात साठतो
अन तू आठवणीत….

तो बहराची स्वप्न दाखवतो
अन तू मिलनाची…!!

तो बरसत नाही
अन तू  तरसवतोस…

आणि उरतो….
…फ़क्त दुष्काळ….!!

त्या मातीचा
अन माझ्या स्वप्नांचा….
कधीही न संपणारा…!!!
यंदा रायगडावर ३४० वा शिवराज्याभिषेक सोहळा २१ जुन रोजी पार पडला. याची देही, याची डोळा पुन्हा एकदा अनुभवण्याचं भाग्य मला मिळालं. शिवाजी महाराज म्हणजे प्रत्येक शिवभक्ताच्या हृदयातील अढळ स्थान...

शिवराज्याभिषेकाला येणार्या प्रत्येकाच्या मनात फक्त आणि शिवराय असतात.दाटलेलं धुकं, ऊन पावसाचा खेळ, कोसळणार्या धबधब्याचं पाणी, हिरवाईने नटलेला रायगड आणि शिव राज्याभिषेकाची झिंग चढलेले शिवप्रभुंचे भक्त....वर्णन करायला शब्दही अपुरे पडतील असा शिव राज्याभिषेक सोहळा....!!

शिव राज्याभिषेकाला निनादणारे मंत्र ऐकताना त्या वेळी पण असचं काहीतरी घडलं असेल, असा विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.भगवा फडकवतानाचा तो क्शण अंगावर सर्रकन काटा आणतो.
खरचं, शिवराय नसते तर???
आपलं अस्तित्त्व काय असतं?? हिंदु धर्म कीती टीकला असता??
एक ना अनेक विचार मनात थैमान घालतात आणि नकळत डोळ्यांच्या कडा ओल्या होतात.

रायगडावर फिरताना मन शिवकालात जातं..

महाराजांनी ह्याचं जगदीश्वराचं दर्शन घेतलं असेलं.... कधीतरी या भुमीला शिव चरणांची धुळ लागली असेल....इथला वारा माझ्या महाराजांच्या अंगा-खांद्यावर खेळला असेल.....

कीती भाग्य सह्याद्रीचं.....
कीती भाग्य या रायगडाचं....
कीती भाग्य इथल्या वार्याचं....
कीती भाग्य या मातीचं.....
आणि नकळतपणे ती माती कपाळी लावली जाते.

शिवप्रभुंच्या मुर्तीसमोर नतमस्तक होताना ऊर अभिमानाने भरून येतो......की हिंदु म्हणून मला जन्म लाभला,मागच्या जन्माचं माहीत नाही पण या जन्मी शिवभक्तीचं बाळकडू मिळालं, शिव राज्याभिषेक सोहळा याची देही, याची डोळा पुन्हा पुन्हा अनुभवण्याचं भाग्य मिळालं.माझ्यासारखी भाग्यवान मीच....

आणि नकळत ओठावर शब्द येतात....

"शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झाली
महाराष्ट्राची माती,
या मातीतचं जन्म लाभला, थोर माझं भाग्य कीती?"

mnyaa.

Wednesday, June 12, 2013

पावसाचं वागणं तुझ्यासारखं...
प्रेमात रिमझिमणार,
रागात कोसळणार,
रूसव्यात बरसणार,
नाहीतर....
आभाळात मिट्ट साचून राहणारं.

वार्याचं वागणं तुझ्यासारखं....
प्रेमात अवखळ,
रागात वादळ,
लाडात झुळूक,
नाहीतर....
सारा आसमंत व्यापणारं.

मोनिका घरत.

Thursday, June 5, 2008

पाऊस

आठवतोय तुला तो पाऊस????
मी.........
मी त्या पावसात चिंब भिजायची,
रानभर धावत सुटायची,
पावसाचा प्रत्येक थेंब झेलण्यासाठी
त्याला कवेत घेण्यासाठी...........
तू........पण तू.........
तू आडोशालाच उभा रहायचास,
एकटाच..!!कोरडा.............
कदाचित, पाऊस तुला कळलाच नसावा.
त्या पावसासारखीच मी,
कवितेतून तुझ्यावर बरसायची,
पण तू.........
तू कधी चिंब भिजलाच नाहीस,
तू फक्त "कोरडा"च राहिलास......
तेव्हाही आणि आत्ताही
कदाचित त्या पावसाचं बरसणं
आणि माझं तरसणं
तुला कधीच समजल नाही........
०५ जुन, २००८.

Tuesday, June 3, 2008

वचन


स्वप्नात पहावेसे वाटते तुला,
स्वप्नात तुझ्यासोबत जगण्याची,
थोडीशी परवानगी देशील???

हातामध्ये हात नको,
आयुष्याची साथ नको,
बोटांचा एक स्पर्श आणि आयुष्याचा एक क्षण देशील???
स्वप्नात तुझ्यासोबत जगण्याची,
थोडीशी परवानगी देशील???

प्रेमाचीही बात नको,
प्रणयाची ती रात नको,
बोलाक्या तुझ्या डोळ्यातले थोडेसेच प्रेम देशील???
स्वप्नात तुझ्यासोबत जगण्याची,
थोडीशी परवानगी देशील???

सत्य मला मान्य आहे,
पण स्वप्न फक्त माझचं आहे,
स्वप्नात नित्य येण्याच,
आज मला तू वचन देशील????
स्वप्नात तुझ्यासोबत जगण्याची,
थोडीशी परवानगी देशील???

Thursday, May 15, 2008

शिवरायांच्या पदस्पर्शाने 
पावन झाली महाराष्ट्राची माती...
याच मातीत जन्म लाभला, 
थोर माझे भाग्य किती?


माझी कविता- माझी सवत

माझी कविता आता माझी सवत झालीय,
कारण ती आता त्याला,
माझ्यापेक्षा आवडु लागलीय.

तो नेहमी म्हणतो,
"राणी, माझ्यावर तु कविता कर,
कवितेतुन बरस माझ्यावर,
कवितेतुनच प्रेम कर."

माझा प्रश्न,
"राजा, फक्त तु एकदाच ठरव,
तुला मी आवडते की कविता?
याचं तु कोड सोडवं."

यावर त्याचं उत्तर,
"अग, तुच माझी कविता,
अन् तुच माझं गाणं;
तुझ्या सोबत आता,
फक्त तुझ्या कवितेतच जगणं."

खरचं, कळत नाही याला,
कवितेचं कसलं वेड लागलयं????
माझीच कविता आतामाझी सवत झालीय.

त्यादिवशी ,
त्यादिवशी तर कहरच झाला,
मला प्रेमाने जवळ घेत म्हणाला,
"मीही एक कविता केलीय,
आपल्या प्रेमाची गाथा मी,
कवितेतुनच गायलीय."

खुशीने डोळे मिटुन,
त्याच्या छातीवर डोक ठेवलं,
तेवढ्यात त्याच्या खिशात
काहीतरी चौकोनी लागलं.

"तुझ्याच कवितांची वही,
राणी, मी माझ्या ह्रुदयाजवळ ठेवलीय,
तुझ्याच कवितेतले शब्द चोरुन,
आपली प्रेमकविता मी केलीय"

यावर उपाय म्हणुन
मी आता कविता करत नाही,
पण तोही आता माझ्याशी,
कवितेशिवाय बोलत नाही.

नको नको त्या कल्पनेतुन
कवितेतुन तो बरसु लागलाय,
त्याच्या कवितेचा अर्थ लावताना
स्वर माझा बिघडु लागलाय.

पण तरीही,
त्याच्या कविता ऐकण्याची
आता मला सवय झालीय.